नेवासा : कार्तिक पौर्णिमेला नेवासा तालुक्यातील देवगड येथे गाभारा दर्शन बंद करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावून बाहेरूनच मुखदर्शन भाविकांनी घ्यावे, असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
२९ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेपासून प्रारंभ होत आहे. दर कार्तिक पौर्णिमेला येथे सुमारे दरवर्षी दोन लाख भाविक भगवान दत्तात्रयासह येथे असलेल्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षीचा कालावधी कोरोनाच्या महामारीचा असल्याने श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेणे बंद केले असून यासाठी भाविकांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिर प्रवेशद्वाराच्या कीर्तन मंडपातून बाहेरून भगवान दत्तात्रयांचे व कार्तिक स्वामींचे मुख दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्तिक पौर्णिमेला शासकीय नियमांचे पालन करून गर्दी होणार नाही याची ही काळजी भाविकांनी घ्यावी, अशाही सूचना मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. कार्तिक पौर्णिमेला होणारे इतर सामुदायिक विधीही रद्द करण्यात आले आहेत. सोमवारी फक्त दुपारची आरती होईल, याची भाविकांनी दखल घेऊन मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.