अहमदनगर : राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०१६-१७ या वर्षीचा राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हिवरेबाजारला जाहीर झाला आहे. हिवरेबाजारने दुस-यांदा राज्यपातळीवरील बक्षीस मिळविले आहे. अभियानातील सातत्य टिकावे यासाठी आमचे गाव दर दहा वर्षांनी या योजनेत बक्षीस मिळविण्याचा प्रयत्न करते, असे हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.हिवरेबाजारने या अभियानात यापूर्वी सन २००६-०७ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यापूर्वी १९९० पासून श्रमदानातून या गावाने स्वच्छतेचा जागर सुरु केलेला आहे. संत गाडगेबाबा अभियान सुरु होण्यापूर्वी रणजित देशमुख ग्रामविकास मंत्री असताना राज्यात ‘ग्राम अभियान’ राबविण्यात आले होते. त्यावेळी १९९४-९५ साली हिवरेबाजारला स्वच्छतेसाठी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला होता.हिवरेबाजार स्वच्छता नेहमीच पाळते. पण, दर दहा वर्षांनी आम्ही या अभियानातील बक्षिसासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, असे पवार यांनी सांगितले.कुठल्याही अभियानात सातत्य टिकणे आवश्यक आहे. अनेकदा गावाला बक्षीस मिळाल्यानंतर गावे पुढे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. तसे होऊ नये, लोकांना विसर पडू नये, नवीन पिढीला स्वच्छतेचे महत्व समजावे यासाठी ठराविक कालखंडानंतर आम्ही बक्षिसासाठी प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.या अभियानात सन २०१६-१७ या वर्षाचा राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मन्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), शेळगाव गौरी (ता. नायगाव, जि. नांदेड) यांना विभागून तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार धाटाव (ता. रोहा, जि. रायगड) व राजगड (ता. मूल, जि. चंद्रपूर) यांना विभागून जाहीर झाला आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी १० लाख तर तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपयांचा पुरस्कार आहे.
गाडगेबाबा अभियानात हिवरेबाजार राज्यात दुस-यांदा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 2:14 PM