अहमदनगर : शनिशिंगणापूर येथील बहुचर्चित गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह त्याचा साथीदार गणेश सोनवणे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली.शनिशिंगणापूर येथे २० डिसेंबर रोजी जुन्या वादातून बानकर गँगने भुतकर याच्यावर तलवार व कु-हाडीने वार करून त्याची हत्या केली होती. याप्रकरणी मयत गणेश याचा भाऊ रामेश्वर याने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात आधी पाच आरोपींना अटक केली आहे. मुख्य मारेकरी बानकर मात्र गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता. बानकर व त्याचा साथीदार सोनवणे हा मुंबई लपला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. पथकाने सात ते आठ दिवस मुंबईत बानकर याचा शोध घेतला. अखेर शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. घटना घडल्यापासून बानकर फरार होता. तो एका ठिकाणी राहत नव्हता त्यामुळे पोलीसांनाही त्याच्या ठिकाणाचा अंदाज येत नव्हता. तो काही दिवस तामीळनाडू राज्यात विविध ठिकाणी राहत होता. मुंबईत येताच स्थानिक गुन्हे शाखेला त्याची खबर मिळाली आणि तो गजाआड झाला. स्थानिक गुन्ह शाखेने याआधी पंकज बानकर, अर्जुन महाले, बाळासाहेब हरकळ, लखन उर्फ लक्ष्मण नामदेव ढगे यांना अटक केली होती.
गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी बानकरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 1:33 PM