Ganesh Festival 2018 : ५०० गावांत एक गाव एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:58 PM2018-09-13T13:58:34+5:302018-09-13T13:58:55+5:30
पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात यंदा ५०० गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे.
अहमदनगर : पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात यंदा ५०० गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. एकूण १२३५ मंडळांना सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे.
यंदा गणेशोत्सव व मोहरम सण एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मोहरम उत्सव व गणेश मंडळांना परवाना घेणे बंधनकारक केले आहे. प्रशासनाकडे परवानगीसाठी एकूण १२७९ मंडळांनी अर्ज केले होते़ यातील १४ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली असून, ३० मंडळांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत़ श्रींची प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्सव काळात काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दहा दिवस प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी, शांतता समितीचा सदस्य, पोलीस मित्र व मंडळाचा एक स्वयंसेवकांची समिती नेमण्यात आली आहे़ सायंकाळी आरतीच्या दरम्यान या समिती सदस्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी गणेश विसर्जनाची मोठी मिरवणूक निघते त्या ठिकाणी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे़ तसेच प्रत्येक मंडळासोबत पोलीस फौजफाटा तैनात राणार आहे.
असा राहणार पोलिसांचा फौजफाटा
जिल्ह्यातील २ हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या १५ प्लाटून, १००० होमगार्ड यासह बाहेरील जिल्ह्यातून २५ अधिकारी व पोलीस बळाची मागणी करण्यात आली आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव व मोहरम शांततेत साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे़ गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ बाहेर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले आहे़ कुठे अनुचित प्रकार निदर्शनास आला तर जनतेने तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.