राजूर : मृत बिबट्याच्या अवयवांची लाखो रूपयांना विक्री करणाऱ्या टोळीला सापळा रचून वेषांतर करीत खरेदीदार बनून भंडारदरावाडी (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथील वन खात्याच्या कर्मचा-यांनी अकोले तालुक्यातील एका आरोपीसह इगतपुरी तालुक्यातील चार जणांना अटक केली.आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.भंडारदरावाडी (टाकेद) येथील वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यात बिबट्यांची हत्या करून त्यांचे अवयव विकले जात असल्याची माहिती समजली होती. इगतपुरी तालुक्यातील खेड मांजरगाव भागातील डोंगरावर बिबट्याची कातडी, नखे, मिशा विकणारी टोळी खरेदीदारांच्या शोधात असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे व वरिष्ठ अधिका-यांना ही माहिती दिली. खरेदीदार बनून तपास सुरू केल्यानंतर हे अवयव त्यांना अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे मिळतील, अशी माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जाधव हे अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे बनावट खरेदीदार बनून गेले. तेथे सोमा मधे (वय ४८ ,रा चिचोंडी) या आरोपीशी संपर्क साधला. त्याने सांगितल्यानुसार संतोष बोडके, बी. व्ही. दिवे, एफ. झेड. सैय्यद, विजय चौधरी, वनरक्षक रामा कोठुळे आदींसह वारंघुशी फाटा येथे पथक पोहोचले. तेथे ६ लाखांमध्ये सौदा ठरला. माल ताब्यात देण्यासाठी त्यांना रंधा परिसरातील जंगलात नेले. माल पाहिल्यानंतर हे सर्व अवयव बिबट्यांना मारूनच या अवयवांची विक्री होत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर रक्कम घेण्यासाठी त्यांना आपल्या वाहनापर्यंत नेण्यात आले. त्यांना अटक करून त्यांच्या जवळील बिबट्याची कातडी व दोन मोटारसायकली जप्त केल्या.विचारपूस केली असता त्यांनी इगतपुरी तालुक्यातील दिलीप पोकळे व गोरख पोकळे यांनी हे आपल्याकडे विक्रीसाठी पाठविल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील आरोपी दिलीप शंभू पोकळे (वय २१), गोरख पोपट पोकळे (वय २०, दोघे रा.पोकळवाडी खेड), भाऊराव संतु भले (वय २५, रा. बारशिंगवे), राजू चंदर पुंजारे (वय ३५,रा. धारगाव ह. मु लोहशिंगवे), मारुती वाळू भले (वय २४, रा. बारशिंगवे )यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून शिताफीने अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमातील कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. २० नखे, बिबट्याच्या मिशा ताब्यात घेणे बाकी आहे.
वारंघुशी येथून मृत बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:47 PM