कामोठेतील बिल्डरला लुटणारी टोळी गजाआड
By Admin | Published: January 10, 2017 06:57 AM2017-01-10T06:57:07+5:302017-01-10T06:57:07+5:30
पिस्तूलचा धाक दाखवून कामोठेमधील बिल्डरला लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : पिस्तूलचा धाक दाखवून कामोठेमधील बिल्डरला लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तूलसह लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मोकाअंतर्गत कारवाईही झालेली आहे.
कामोठे येथील बिल्डरच्या कार्यालयात घुसून अज्ञातांनी जबरी दरोडा टाकल्याची घटना गतमहिन्यात घडली होती. या प्रकरणी सखोल तपासाअंती गुन्हे शाखेच्या कक्ष २ च्या पथकाने तिघांना अटक केली आहे. प्रशांत ठाकूर (२३), विक्रांत चव्हाण (३१) व प्रशांत म्हात्रे (२८) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही सराईत गुन्हेगार असून अनुक्रमे ठाणे, घणसोली व कामोठे येथील राहणारे आहेत.
दरम्यान वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना सदर टोळीची माहिती मिळाली असता, सहायक निरीक्षक बबन जगताप, किरण भोसले, सुभाष पुजारी, हवालदार विजय आयरे, सुनील कानगुडे यांचे पथक पाळत ठेवून होते. अखेर ते तिघेही घणसोलीत येणार असल्याची माहिती मिळताच गावदेवी मंदिराच्या परिसरातून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानुसार प्रशांत ठाकूर, विक्रांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी मोका अंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे. झडतीमध्ये या तिघांकडून १० लाख ५० हजार रुपये किमतीचे ३६९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, चार मोबाइल तसेच देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे असा ११ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपआयुक्त दिलीप सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
च्तिघेही सराईत गुन्हेगार असून ठाणे, घणसोली व कामोठे येथे राहणारे आहेत. त्यांनी कामोठे येथील बिल्डरच्या कार्यालयात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून दागिने लुटले होते. या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे डोके वर काढू पाहत असलेल्या टोळीच्या शोधाकरिता उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ च्या पथकाने कंबर कसली होती.