राहुरी : ऊसतोडीपोटी शेतक-यांकडून चार हजार रुपये उकळणा-या तोडणी टोळीचा गुरुवारी राहुरी तालुक्यात पर्दाफाश झाला.उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. तसेच संबंधित शेतक-याला पैसे परत मिळवून देत वादावर पडदा टाकला.पिंपळाच्या मळ्यात संदीप ढवळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तोडणीपोटी कामगारांनी चार हजार रुपये मागितले. ढवळे यांच्या वाटेक-यांनी कामगाराच्या मुकादमाला चार हजार रुपये दिल्यानंतरही तोडणी कामगारांनी ऊस अर्धवट तोडून पळ काढला. त्यामुळे ढवळे यांनी व्हॉट्सअॅपवरून कारखान्याच्या अधिका-यांकडे तक्रार नोंदविली. व्हॉट्सअॅपवर आलेल्या पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरी गाठली. मुकादमास बोलावून पैसे घेतल्याची खात्री केली. चौकशीत ऊसतोडणीपोटी चार हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. अधिका-यांनी मुकादमाकडून पैसे मागवून घेतले. याशिवाय तोडणी टोळीचे काम काढून घेतले़ राहिलेला ऊस काढून देऊ, असे सांगत अधिका-यांनी संगमनेर गाठले.ऊस जास्त झाला, अशी अफवा सोडून साखर कारखान्यांनी कमी भावात शेतक-यांकडून ऊस घेतला़ याशिवाय काही काळासाठी कारखान्यांनी टोळयाही काढून घेतल्या़ त्यामुळे भयभीत झालेल्या शेतक-यांनी शरणागती पत्करली. शेतक-यांच्या मजबुरीचा फायदा घेत ऊसतोडणी कामगारांनी बोकड, दारू व पैसे वसूल करण्यास सुरूवात केली. साखरसम्राटांचे उंबरे झिजविण्याची वेळे शेतक-यांवर आली. त्यातच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी असतानाही उसाचे पीक कसे जगवायचे? असा प्रश्न शेतक-यांपुढे आहे.
बारा कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत
राहुरी तालुक्यात सध्या स्थानिक राहुरी, प्रसाद शुगरसह संगमनेर, अगस्ती, प्रवरा, संजीवनी, कोळपेवाडी, कोळपेवाडी, अशोकनगर, युटेक, दौंड शुगर, अंबालिका, श्रीगोंदा अशा बारा साखर कारखान्यांच्या टोळया कार्यरत आहेत. राहुरी कारखाना सुरू झाल्यानंतर बाहेरील साखर कारखान्यांना ऊस जाऊ देणार नाही, अशी गर्जना तनपुरे कारखान्याचे सूत्रधार डॉ. सुजय विखे यांनी केली होती. त्यानंतर बाहेरील कारखान्यांनी टोळ्या काढून घेतल्या. अल्प प्रमाणावर टोळ्या कार्यरत राहिल्याने आपला ऊस जाणार का? याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.