शेवगाव : वाहतुकीच्या नावाखाली सोयाबीन चोरणाºया टोळीचा लोणार (जि. बुलढाणा) पोलिसांनी शेवगावात येऊन पर्दाफाश केला आहे. गुंतागुंतीच्या तपासातून तब्बल नऊ महिन्यानंतर सदर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी शेवगाव तालुक्यातून तिघा जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याप्रकरणी मुख्य आरोपी अंबादास राधाकिसन सानप (वय ३६, रा.ठाकूरपिंपळगाव, ता.शेवगाव) याच्यासह सहआरोपी योगेश आबासाहेब बोडखे (वय ३६), गणेश भिमराव निकम (वय ३५, दोघे राहणार, शेवगाव) या तिघा जणांना लोणार पोलिसांनी अटक केली आहे.
सानप याने वाशिम येथील एका हॉटेलमधून मोबाईल फोन चोरुन चिखली येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाला चोरलेल्या फोनवरुन संपर्क साधत ‘माझी गाडी मोकळी आहे, भाडे असल्यास सांगा’ असा फोन केला. संबंधित ट्रान्सपोर्ट मालकाने सानप यास चिखली येथून नागपूर येथे सोयाबीन घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार सानप याने ३ जानेवारी २०२० रोजी सुमारे ११ लाख ५ हजार रुपये किमतीचे, २५७ क्विंटल सोयाबीन त्याच्या ट्रकमध्ये भरुन नागपूरकडे घेऊन न जाता थेट शेवगाव येथे आणला. तो एका व्यापाºयाला विकला होता. नागपूर येथे माल पोहच न झाल्याने सदर माल चोरीस गेल्याचा संशय बळावल्याने १० जानेवारी रोजी लोणार पोलिसांत गुन्हा दाखल होता. सानप यांच्याविरुद्ध वाशिम येथेही गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सहायक निरीक्षक अझहर शेख यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल सुरेश काळे, पोलीस कर्मचारी कृष्णा निकम, विशाल धोडगे यांच्या पथकाने शेवगावात दोन दिवस मुक्काम ठोकून या प्रकरणाचा तपास करुन आरोपींना बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी जगन्नाथ विष्णूपंत जायभाय (रा. लोणार, जि. बुलढाणा) यांनी लोणार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी त्या ट्रान्सपोर्ट मालकास आलेल्या मोबाईल क्रमांकावरुन तपासाची दिशा ठरवून तपास केला.
तपासादरम्यान चिखली येथून चोरलेला सोयाबीन शेवगाव येथे आणून विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक करणार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस सहायक निरीक्षक अझहर शेख यांनी सांगितले.