या आगीमुळे जंगलातील मोठमोठे वृक्ष खाक झाले. तसेच काही पक्षी, प्राणीही या आगीत होरपळले आहेत. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात गर्भगिरी डोंगराच्या रांगा आहेत. नगर व बीड जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या डोंगरांत शासनाने लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड केलेली आहे. मागील वर्षी या भागात चांगला पाऊस झाल्याने डोंगरात दाट झाडी झाली होती. मात्र १५ दिवसांत दोन वेळा या जंगलास आग लागल्याने जंगलाचे १०० ते १५० एकर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. वाळलेल्या गवतामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. जंगलातील नुकसानीसंदर्भात तिसगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. या सर्व प्रकारची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, रोहित अकोलकर, राजेंद्र अकोलकर, राहुल अकोलकरसह अनेकांनी केली आहे.
गर्भगिरी डोंगराला पुन्हा आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:19 AM