बाळासाहेब काकडेशेतीसाठी आणि वीटभट्टीच्या व्यवसायासाठी प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडणारे राजापूरचे अशोक ईश्वरे यांनी दोन एकर क्षेत्रात इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अवलंब करून केशर आंब्याची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी दोन एकरात बारा मेट्रीक टन आंब्यातून सुमारे सात लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे ईश्वरे यांच्या कुटुंबात आंब्यातून आर्थिक गोडवा निर्माण झाला आहे.अशोक ईश्वरे यांचे वडील ज्ञानदेव ईश्वरे हे भूमिहीन होते. कुंभार काम करून विठ्ठल व अशोक दोघांना शिकविले. प्राथमिक शिक्षक केले. खडतर दिवस बदलले. अशोक व विठ्ठल यांनी नोकरीतील पैशातून बचत करून राजापूरमध्ये हळूहळू २५ एकर जमीन घेतली. घोड नदीवरून पाण्याची व्यवस्था केली. एक वीटभट्टी सुरू केली. शेती आणि व्यवसायाची गोडी असलेले अशोक ईश्वरे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतली आणि शेतीत लक्ष घातले.१० एकर क्षेत्रात ऊस, द्राक्ष, केळी व आंब्याची प्रत्येकी दोन एकर लागवड केली. काही क्षेत्र कलिंगड खरबुजासाठी राखीव ठेवले.आंब्याची लागवड ही कृषी विभागाच्या नियमानुसार न करता इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अवलंब करून केशर, हापूस, तोतापुरी, राजापुरी, लंगडा जातीच्या आंब्याची लागवड १५ बाय १५ फुटावर केली. त्यावर ठिबक सिंचन बसविले. शेणखताचा वापर करून सेंद्रीय पध्दतीने आंब्याचे उत्पादन घेतले. पहिल्याच वर्षी बारा मेट्रीक टन उत्पादन निघाले. त्यामधून सुमारे ७ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.घोड नदी काठावरील शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीची गोडी लागण्यासाठी ईश्वरे यांनी दोन एकर सुपर सोनाका द्राक्ष लागवड केली. त्यामुळे परिसरातील तरुण शेतकरी द्राक्ष लागवडीकडे आकर्षित होऊ लागले आहेत.आमचे वडील भूमिहीन होते. त्यांनी कुंभारकीचा व्यवसाय करून आम्हा दोघा भावांना शिकविले. आम्ही प्राथमिक शिक्षक झालो. पगारातून बचत करून शेती घेतली आणि शेतीत लक्ष देण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. शेतीतून खूप समाधान, आनंद मिळत आहे, असे अशोक ईश्वरे यांनी सांगितले.
इस्त्रायल तंत्रज्ञानाने फुलविली आंब्याची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:48 AM