अहमदनगर : वर्षभरात दोन ते तीन वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. गत महिन्यात २५ रुपयांची दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा २५ रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे नगर शहरात आता एक गँस सिलिंडर ८७३ रुपयांना मिळणार आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता ऐन सणासुदीच्या काळात दरवाढीचा फटका बसणार आहे.
गत वर्षभरात गॅस सिलिंडरच्या दरात २६५ रुपयांची दरवाढ झाली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती जवळपास दरमहा वाढविल्या आहेत. गत वर्षभरात २६५ रुपयांनी सिलिंडरचे दर वाढले आहेत. दोन वेळा २५ रुपयांची दरवाढ करून एकाच महिन्यात ५० रुपयांनी दरवाढ करून सरकारने सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशाच सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. २०१४ मध्ये गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
-----------------
वर्षभरात २९० रुपयांची दरवाढ
महिना दर (रुपयात)
सप्टेंबर- २०२० ६०७.५०
डिसेंबर- २०२० ७०७.५०
फेब्रुवारी- २०२१ ७८२.५०
मार्च २०२१ ८३२.५०
जून २०२१ ८२२.५०
जुलै २०२१ ८४८.५०
ऑगस्ट २०२१ ८७३
----------------
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
१) गॅस ग्राहकांना मिळणारे १५३ ते २९१ रुपयांचे अनुदानही आता बंद झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाला चारशे ते पाचशे रुपयांची झळ सोसावी लागत आहे.
२) अनुदान म्हणजे ग्राहकांकडून पैसे घ्यायचे, ते वापरायचे आणि तेच नागरिकांना परत द्यायचे. तेही विनाव्याज, अशी ही योजना होती. आता सबसिडी तर बंद केली. शिवाय दरवाढ केल्याने ग्राहकांचीच आर्थिक पिळवणूक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
--------------
शहरात चुली कशा पेटवायच्या?
गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आधीच कामधंदे कमी झाले आहेत. खेड्यात राहिले तर चुलीवर तरी स्वयंपाक करता येतो. मात्र, शहरात चुलीवर स्वयंपाक कसा करायचा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे गॅसच्या किमती कमी झाल्या पाहिजेत.
- विष्णू भूतकर, नगर
-------------
एकदा नव्हे तर आतापर्यंत सात ते आठ वेळा दरवाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. एकीकडे महागाई वाढली आहे. किराणा माल्याच्या किमती वाढत्या आहेत. गॅसच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न आहे.
-हरिभाऊ टकले, नगर
------------
व्यावसायिक सिलिंडरमध्ये शंभरची वाढ
व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरमध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. आधी हे सिलिंडर १५५३ रुपयांना मिळत होते. ते आता १६५६ रुपयांना मिळत आहेत. त्यामुळे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.
-----------
डमी क्रमांक-१०७३