अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व सहकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणा-यांवर आरटीओ व पोलिसांचे पथक थेट कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन कारवाई करणार असल्याचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांच्यासह महापालिका, बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते़ यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्हाभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ११ तारखेपर्यंत शासकीय अधिकारी, कर्मचा-यांनी हेल्मेट खरेदी करावेत, त्यानंतर आरटीओ व पोलीस पथक सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन तपासणी करणार आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करून याबाबतची तक्रार त्यांच्या विभागाप्रमुखांकडे केली जाणार आहे. शासकीय कर्मचा-यांसह इतरांनाही हेल्मेट सक्ती असून, त्यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालय, खासगी क्लासमध्ये मोटारसायकलवरून येणा-या विद्यार्थ्यांनाही हेल्मेट वापराबाबत सूचना देण्यात येणार आहे. क्लासचालकांनी सर्व विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्याबाबतच्या सूचना त्यांना परिवहन विभागाकडून देण्यात येणार आहेत.बाजार समितीत एकेरी वाहतूकयेथील बाजार समितीत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत येथील वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या प्रवेशद्वारातून गेलेले वाहन परत त्या मार्गे न आणता पाठीमागील रस्त्याने न्यावे लागणार आहे. याबाबत बाजार समिती व्यवस्थापनाला दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ट्रॅक्टरचे साऊंड काढणारऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक मोठमोठे म्युझिक साऊंड लावून रस्त्याने गाणे वाजवित जातात. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहून अशा ट्रॅक्टरचालकांचे साऊंड काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटारसायकलीसोबतच खरेदी करावे लागणार हेल्मेटमोटारसायकलची विक्री करताना त्यासोबत वाहनविक्रेत्यांनी ग्राहकांना हेल्मेट देनेही बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व वाहन शोरूमचालकांना पत्र देण्यात येणार आहे. नवीन मोटारसायकलीची नोंदणी करताना हेल्मेट विकत घेतल्याची पावती दाखविल्याशिवाय नोंदणी केली जाणार नसल्याचे पाटील म्हणाले.
हेल्मेट न घालणा-या सरकारी कर्मचा-यांना अडविणार गेटवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:32 PM