लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील दहा गावांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. त्यापैकी २.५ किलोमीटर अंतर हे पुलांचे आहे. मात्र, काम सुरु झाल्यापासूनच गायत्री प्रोजेक्ट लि. हैदराबाद या ठेकेदार कंपनीचा प्रवास धिम्यागतीचा व तितकाच वादग्रस्त राहिला आहे. सद्यस्थितीत ५० टक्केच मातीच्या भरावाचे काम झाले, असून अवघा ७ किलोमीटर सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळूनही ही कंपनी वेळेत काम करण्यात अपयशी ठरली आहे.
या महामार्गाचे काम सुरु झाल्यापासूनच ठेकेदार कंपनीला शेतकरी, ग्रामस्थ यांच्या रोषाला कायमच सामोरे जावे लागले. वेळ प्रसंगी अनेकवेळा काम करणारी वाहने आंदोलन करीत दिवसदिवस उभी करून ठेवण्यात आली. या कंपनीने अनेक उप-ठेकेदारांना काम दिलेले आहे. हे काम करताना घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन न केल्याने भरावासाठी मातीची वाहतूक करताना धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. तर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. विशेष म्हणजे या रस्त्याच्या भरावासाठी मुरुमाऐवजी वापरण्यात आलेल्या मातीसंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी माहितींच्या अधिकारातून माहिती काढत मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या. मात्र, कोणत्याच स्तराहून याची दखल घेतली गेली नाही.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे, घारी, डाऊच बु., चांदेकसारे, जेऊरकुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे व धोत्रे या दहा गावातून समृद्धी महामार्ग जातो.
या ३० किलोमीटर दरम्यान लहान – मोठे असे एकूण १३७ पूल आहेत. त्यापैकी सर्वात मोठे दोन इंटरचेज आहेत. तसेच गोदावरी नदी, कोळ नदी, खडकी नदी, मनमाड-दौंडरेल्वे मार्ग, चांदेकसारे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन, देर्डे-कोऱ्हाळे येथे दोन असे एकूण आठ मोठे उड्डाणपूल आहेत.
दहा गावांतील महत्त्वाची रहदारी असलेल्या स्थानिक रस्त्यासाठी एकूण २७ लहान पूल आहेत. तर प्राण्यासाठी,पाट, चाऱ्या, शेतकऱ्यांसाठी, पाईपलाईनसाठी, १०० बोगदे असून सर्वाचे काम सुरु आहे.
.....................
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे काम करताना गायत्री प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीने भरावासाठी मुरूम वापरणे अभिप्रेत होते. परंतु, या कंपनीने सर्रासपणे मातीचा वापर केला आहे. हे सर्व माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही बाब संबंधित कंपनीसह शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली. परंतु, काहीच कारवाई झाली नाही. या रस्त्याला मातीचा वापर केल्याने काही दिवसात रस्त्याचे वाटोळे होणार आहे. या संदर्भात मी लवकरच न्यायालयात खटला दाखल करणार आहे.
-बाळासाहेब जाधव, सामजिक कार्यकर्ते, कोकमठाण, कोपरगाव
.............
ठेकेदार कंपनीला ४६ कोटींचा दंड!
महामार्गाच्या भरावासाठी लागणाऱ्या माती-मुरुमाचे तालुक्यातील देर्डे - कोऱ्हाळे व धोत्रे येथील शेतकऱ्यांच्या शेतातून मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गायत्री प्रोजेक्ट लि. कंपनीला ४५ कोटी ७७ लाख २९ हजार ६०० रुपये तर डाऊच बुद्रुक येथील उत्खननासाठी रँणडबँड इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीला १३ लाख असे दोन्ही मिळून ४५ कोटी ९० लाख २९ हजार ६०० रुपयांचा गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये एकत्रित दंड ठोठावत पुढील कारवाईसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविला आहे.
....................
फोटोओळी –
कोपरगाव तालुक्यात कोकमठाण शिवारात महामार्गाच्या भरावासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने भराव ठिकठिकाणी खचला आहे.
----------
फोटो - १५ समृद्धी महामार्ग भराव - कोपरगाव