बोटा : एका ४६ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत तोंडात जिलेटीन फोडून आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे मंगळवारी (२९ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुखदेव किसन मधे (वय ४६, रा.येलखोपवाडी, अकलापूर, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यानंतर सुखदेव मधे हे दारूच्या नशेत घरी आले. काही वेळानंतर त्यांनी जिलेटीन कांडी तोंडात धरून वीज बोर्डातून करंट घेतला. यामुळे झालेल्या स्फोटात सुखदेव मध हे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी तातडीने घटनास्थळी भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. बुधवारी शिर्डी येथील बॉम्बनाशक पथक व फॉरेंसिक टीम, एक्सप्लोजिव एक्सपर्ट पथकाने अकलापूर येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनेची आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.