आकाश येवले
राहुरी : दक्षिण जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात मच्छीमारांकडून मासेमारीसाठी करण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या स्फोटामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या समोर हा प्रकार होत असूनही अद्याप प्रशासनाने यावर कार्यवाही केलेली नाही.
मुळा धरणात अनेक वर्षांपासून जिलेटिनचा स्फोट करून मच्छीमारी केली जात आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. रात्री जिलेटिनचा स्फोट केला जातो. त्या स्फोटामुळे हजारो मासे दररोज मृत्युमुखी पडतात. मच्छीमार सकाळी हे मासे गोळा करून विक्रीसाठी नेतात. त्यामुळे मुळा धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
मुळा धरणाच्या ३५ किलोमीटरच्या परिसरामध्ये संरक्षणाची गरज आहे. मुळा धरणावर पूर्वी दीडशे कर्मचारी तैनात होते; परंतु त्यातील बहुतांश कर्मचारी आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांची संख्या १४ वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देणे गैरसोयीचे होत आहे.
दरम्यान, पाण्यात होणारे हे स्फोट कोण करते? मच्छीमार करतात की आणखी कोणी याबाबत मुळा पाटबंधारे विभागाकडे कोणतीही माहिती नाही. मात्र, स्फोट होतात, हे ते मान्य करतात. मग स्फोट करणारे वर्षानुवर्षे कसे सापडत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.
---------
मुळा धरणावरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. रात्री स्फोट होतात. त्याचा शोध घेण्यासाठी व कारवाईसाठी राहुरीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना उद्या (दि. ३०) पत्र देण्यात येणार आहे.
- अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण शाखा अभियंता
------------
धरणातील झोपड्या कोणाच्या?
धरणाच्या कडेला आठ ते दहा झोपड्या करून काही कुटुंब राहतात. ते कोणाच्या परवानगीने धरण भागात राहतात. पाटबंधारे विभाग त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------
फोटो कॅप्शन-
मुळा धरणात अतिक्रमण करून राहणारे कुटुंब.