अनिल साठे । शेवगाव : जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. आंद्रे बोस्से त्यांच्या सात सहका-यांसह शेवगावच्या नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करीत आहेत. या कामासाठी त्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या या सेवेमुळे अनेक गरजू रुग्णांना नवा चेहरा मिळाला आहे.शेवगाव शहरातील नित्यसेवा हॉस्पिटल येथे सोमवारपासून (दि.३ फेब्रुवारी)मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन केले आहे. २०१३ सालापासून दरवर्षी हे शिबिर भरवण्यात येते. डॉ. आंद्रे बोस्से यांच्यासह त्यांचे सहकारी इवा, मायनीन, गाबी, मारिया, पेत्रा, अण्णा लीना यांनी दीडशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी शंभरहून अधिक रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते. त्यांनी त्यांच्यावर तसे उपचारही सुरू केले. दुभंगलेले ओठ, पापण्यांची विकृती, चेहºयावरील व्रण व डाग, तसेच नाक, कानावरील बाह्य विकृतीवर मोफत, जळलेला भाग, चिकटलेली मान अशा व्याधींवर सर्जरी केली जाते. या शिबिरादरम्यान मोफत जेवणाची सोय करून उपचार केलेल्या रूग्णांची विशेष देखभाल ठेवली जाते. ८०० हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.शरिरावरील अशा व्याधीमुळे अनेक मुलींचे लग्न जमत नव्हते. मात्र सर्जरी केल्यावर त्या मुलींचे लग्न जमले, असे सिस्टर हिल्डा यांनी सांगितले. डॉ. आंद्रे हे सहा वर्षांपासून सेवाभाव या वृत्तीने इथे येतात. भारतीयांविषयी त्यांच्या मनातील आदर ठळकपणे जाणवतो. सर्वांशी हसून तोडके, मोडके मराठी शब्द बोलत आपलेपणाने चौकशी करतात. त्यांची टीमही त्यांना या कार्यात मोलाची साथ देत आहे.ज्या वेळी मी आॅपरेशन थिएटरमध्ये रुग्णांवर उपचार करीत असतो, त्यावेळी मी डोक्याने नाही तर हृदयापासून काम करतो. आॅपरेशन करताना मला अभ्यास नाही तर रुग्णांच्या चेहºयावरील प्रेमळभाव यश मिळवून देतो. इथल्या लोकांची प्रेमळ भावना मला ऊर्जा देते, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.येथील समाधान अन्यत्र मिळत नाही.
मी अनेक देश फिरलो, पण येथे आल्यावर जे समाधान लाभते ते अन्यत्र कुठेच मिळत नसल्याचे डॉ. आंद्रे यांनी सांगितले.