अहमदनगर : लसीचे दोन्ही डोस घेऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांना आता रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी युनिव्हर्सल पास ऑनलाइन लिंकवरून मिळत आहे. मोबाईलवरूनही हा पास डाऊनलोड करण्याची सोय त्यात देण्यात आल्याने दोन्ही डोस घेतलेले हा पास प्राप्त करत आहेत.
कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर माॅल, रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु ज्यांनी दोन्ही लसीचे डोस घेतले आहेत, अशांनाच यासाठी सूट देण्यात आली आहे. प्रत्येकाला लसीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने अशा लोकांसाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. केवळ शासनाच्या लिंकवर जाऊन मोबाईल क्रमांक टाकून काही प्रक्रिया केली की पास डाऊनलोड होतो. अनेक जण त्याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.
-----------------
४ लाख १५ हजार जणांनी घेतले दोन्ही डोस
नगर जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ३८ लाख ८७ हजार ७६४ जणांना कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यात आतापर्यंत १० लाख ५४ हजार जणांनी पहिला (२७ टक्के), तर ४ लाख १५ हजार ७२४ जणांनी दुसरा (११ टक्के) डोस घेतला आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्या ४ लाख १५ हजार लोकांना हा पास डाऊनलोड करता येणार आहे.
----------------
दोन्ही डोस घेतलेले
फ्रंट लाईन वर्कर्स - ३६,३४५
आरोग्य कर्मचारी -३४,२३३
१८ ते ४४ वयोगट - ४७,५५६
४५ ते ६० - १,४५,४७९
६१ पेक्षा जास्त वयाचे - १,५२,०००
---------------
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण - ११ टक्के
-----------
असा मिळवा ई-पास
- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
-त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक आदी तपशील आपोआप समोर दिसतील.
-त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
-त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
-या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघु संदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.