शिर्डी : साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीत पुरवठादाराने काही विश्वस्त व अधिका-यांवर लाच दिल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व सबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला दिला आहे.हरियानातील एका तुपाच्या पुरवठादाराने टेंडर पोटी आपण काही विश्वस्त व अधिका-यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचे ८ डिसेंबर रोजी व्यवस्थापनाच्या बैठकीत सांगितले़ त्यासंबधी पुरावे असल्याचेही त्याने पत्राद्वारे कळवल्याचेही समजते़ याशिवाय खासदार सदाशिव लोखंडे यांनीही पत्रकार परिषद घेवून तूप खरेदीत विश्वस्त व अधिकाºयांना लाखो रूपये दिल्याचा आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली होती. मात्र या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. हे प्रकरण आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, लाचखोरीचे असून त्यामध्ये विश्वस्त व वरिष्ठ अधिकारी सामिल असल्याचे आरोप होत असल्याने सदर प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठवावा व दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. अन्यथा सर्व विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी व संबंधित पुरवठादार यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. संस्थानचा बुंदी लाडुचा प्रसाद भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. तो दर्जेदार असावा यासाठी कुलकर्णी यांनी यापूर्वी उच्च न्यायालयातही दाद मागितलेली आहे.
साई संस्थानामध्ये तूप घोटाळा?; कुलकर्णी यांचा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:46 PM