श्रीगोंदा : तालुक्यातील घोडेगाव नं.१ विविध कार्यकारी सेवा सोसायटीत लाखो रुपयांच्या अपहार आणि गैरव्यवहार झाला होता. यामुळे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी ही सोसायटी विसर्जित केली आहे. तसा आदेशही निबंधकांनी काढला आहे.
या सोसायटीचा चालू तोटा २० लाख ३३ हजार ३३७ रुपये आहे. संचित तोटा १ कोटी ८९ लाख २७ हजार रुपये आहे. १ कोटी ७८ लाख ३५ हजार ५९८ रुपये एवढी अनिष्ट तफावत या सोसायटीत दिसून येत आहे.
या सोसायटीमध्ये कायदा, उपविधी, सहकारी संस्था व बँकांचे आदेश पाळले जात नाहीत म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये ही सोसायटी अवसायनात काढण्यात आलेली आहे.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालामध्ये ६ कर्ज खात्यात २२ लाख ५ हजार ७०० रुपये एवढ्या रकमेचा गैरव्यवहार झाला असल्याचे आदेशात नमूद केलेले आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी श्रीगोंदा यांनी ९ कर्ज खात्यामध्ये ३७ लाख ६० हजार ३०६ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे. या सर्व गैरव्यवहाराला संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, संस्थेने नियुक्त केलेले लोकल सचिव आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
विनायक भानुदास मचे व इतर ४ तक्रारदारांनी याबाबत निबंधकांकडे तक्रार केली होती.