संगमनेर : संगमनेर शहरातील एका खासगी कार्यालयात अचानक घुसलेल्या घोरपडीने कार्यालयातील कर्मचा-यांची चांगलीच पळापळ झाली. हा प्रकार अकोले नाक्याकडे जाणा-या रस्त्यावरील प्रवरा चिट्सच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.
अकोले नाक्याकडे जाणा-या रस्त्यालगत प्रवरा चिट्सचे कार्यालय आहे. या कार्यालयाचा मंगळवारी दरवाजा उघडा होता. आत कर्मचारी काम करीत असताना दरवाजातून भरभर काहीतरी आल्याचे कर्मचा-यांनी पाहिले. सर्वांनी घाबरून हातातील काम सोडून बाहेर पळ काढला. प्रवरा चिट्सचे शाखाधिकारी संकेत मुळे यांनी याबाबत प्राणी, पक्षी मित्र भूषण नरवडे यांना कळविले. नरवडे हे त्यांचे सहकारी यश गाडेंसह तेथे पोहोचले. कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता त्यात हा प्राणी घोरपड असल्याचे समजले.
कार्यालयात घोरपड घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. नरवडे व त्यांच्या सहका-यांनी या घोरपडीला कुठलीही इजा होवू न देता अलगद बारदान्याच्या गोणीत पकडले. त्यानंतर सर्व कर्मचाºयांनी सुटकेचा निश्वास टाकला.