अहमदनगर : राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी सोमवारी भेट घेतली.नेवासा मतदारसंघात घुले हे गडाख यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. ते ठिकठिकाणी मेळावेही घेणार आहेत़. गडाख व घुले यांनी एकत्र येत भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून स्वत: उमेदवारी न करता प्रताप ढाकणे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी हे घुले यांचे कार्यक्षेत्र आहे. नेवासा मतदारसंघातील क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेवासा मतदारसंघातून उमेदवार न देता गडाख यांना पाठींबा दिला आहे. यामुळे गडाख यांना घुले यांची मजबूत साथ मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर घुले व गडाख यांची सोमवारी भेट झाली. नेवासा तालुक्यात घुले यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नेवासा तालुक्यातील घुले यांची यंत्रणा गडाख यांच्यासाठी काम करणार असून, तशा सूचना घुले यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते. घुले गडाख यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत़. यामुळे घुले यांचे पारडे जड झाले आहे.
चंद्रशेखर घुले गडाखांच्या प्रचारात सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 1:19 PM