जामखेड (जि. अहिल्यानगर) - जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांतच नकार दिला. जमलेले लग्न मोडल्याने २२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि. २७) लग्न जमलेल्या मुलासह त्याच्या आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी मुलीचे वडील सतीश दादासाहेब सुरवसे (रा. डिसलेवाडी, ता. जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे (हल्ली रा. चिखली कदळवाडी मोशी, पुणे, मूळ रा. कर्जत), अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे ( रा. कर्जत, जि. अहिल्यानगर) या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.
मोनिका सतीश सुरवसे (वय २२,रा. डिसलेवाडी, ता. जामखेड) हिचा विवाह कर्जत येथील मेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र, लग्न जमल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२५ ते २७ मार्च २०२५ पर्यंत मुलगा महेश मेंगडे हा तिचा अपमान करत असे. ‘तू मला आवडली नाही’, ‘मला तू मॅच होत नाही’, ‘आपली जोडी शोभून दिसत नाही,’ असे म्हणून मोनिकाचा अपमान करत असे. मुलाची आई अनुजा मेंगडे व वडील दत्तात्रय मेंगडे हेही मुलीच्या वडिलांना म्हणत होते की, ‘तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभत नाही’. त्यामुळे मुलीचे जमलेले लग्न मोडले. या कारणातून मुलीला मानसिक त्रास झाला. यातूनच तिने गुरुवारी डिसलेवाडी येथे गळफास घेतला.