अहमदनगर : जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी दाखल केलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रूग्णालयातच ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला.पोलिसांची मध्यस्ती केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात राहणारे दीपक मनोहर लोणारे यांची मुलगी राधिका ही अशक्तपणामुळे आजारी असल्याने तिला शुक्रवारी (दि़२) दुपारी साडेबारा वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सायंकाळीसाडेसात वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर मुलीचे नातेवाईक रूग्णालयात दाखल झाले़ हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध नव्हते, परिचारिका स्टाफ यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली तसेच मुलीला घरी घेऊन जात असल्याबाबत मुलीच्या आईची स्वाक्षरी घेतली़ असा आरोप करत या मृत्यूची चौकशी करून शवविच्छेदन घाटी रूग्णालयात करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली़ दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी नातेवाईकांशी संवाद साधला़ मयत मुलीचे वडील दीपक लोणारे यांनी दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले़दरम्यान मयत मुलीचे घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़ यावेळी निलेश भांगरे, मयुर भांगरे, रोहित घोरपडे, अन्सार शेख, अभय रणदिवे, धनंजय चव्हाण, राजू परदेशी, कृष्णा पेठारे, योगेश इंगळे, ज्ञानेश्वर गारुडकर, यशवंत बदलावले आदी उपस्थित होते़
‘सिव्हील’मध्ये उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू : नातेवाईकांचा रूग्णालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:36 PM