नेवासा : राज्यातील अनेक मंदिरातील विविध प्रश्नासाठी आमची संघटना लढत असून राज्यातील मंदिरात ५०% महिला विश्वस्थ तसेच महिला पुजारी नेमावे, या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे भूमाता रणराणीगी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले. तसेच शनी शिंगणापूर देवस्थानवर सरकारने विश्वस्थ मंडळाची नेमणूक करून अध्यक्षपद भूमाता रणराणीगी ब्रिगेडला द्यावे यासाठी मुख्यमंत्रांची भेट घेणार असल्याचे शनी शिंगणापूर येथे बोलतांना देसाई यांनी सांगितले.भूमाता रणराणीगी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपल्या सहका-यांसमवेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शनी शिंगणापूरात दाखल झाल्या. त्यांनी शनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतले.तृप्ती देसाई म्हणाल्या, शनी शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेऊन दोन महिने झाले असले तरी अजून जुनेच विश्वस्त मंडळ काम पाहत आहे. सध्याचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांना कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग सरकार नवीन विश्वस्त मंडळ का निवडत नाही. तरी सरकारने त्वरित विश्वस्त मंडळाची नेमणूक करून त्यात ५० टक्के महिलांना स्थान द्यावेत. भूमाता रणरागिणी ब्रिगेडला अध्यक्षपद द्यावं, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार आहे.शिंगणापूरसह संपूर्ण राज्यातील मंदिरात दर्शनासाठी स्त्री-पुरुष समानता असावी. याकरिता मोठे आंदोलन केले होते. शिंगणापूर येथील आंदोलनाची देशात-परदेशात दखल घेतली गेली. देशातील महिलांना शनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मिळाला. त्यामुळे भूमाता ब्रिगेडला सरकारने अध्यक्षपद दिले तर अच्छे दिन आल्यासारखे वाटेल, असेही त्या म्हणाल्या. देसाई यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस शीतल खर्डे, अनिता शर्मा,राजश्री जोशी, वैशाली नानोर यांच्यासह सहकारी उपस्थित होते.