अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई व महात्मा फुले या दांपत्याने तत्कालीन समाजामध्ये केलेल्या क्रांतिकारी कामामुळेच आज शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली आहे. म्हणूनच फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली.
काँग्रेस कार्यालयात बुधवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी काळे बोलत होते. यावेळी ओबीसी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, विलास उबाळे, गणेश चव्हाण, उषा भगत, मिनाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, अभिनय गायकवाड, रोहिदास भालेराव, गणेश चव्हाण, किशोर कोतकर, गौरव घोरपडे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, सचिन लोंढे, देवराम शिंदे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले स्वतःच्या कुटुंबाला दिशा देण्याबरोबरच समाजालाही दिशा देण्याची ताकद आजच्या महिलांमध्ये आहे.
क्षेत्र कोणतेही असो सर्वच ठिकाणी आज महिला स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे येताना दिसत आहेत. ही बाब महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्याकाळी रोवली व रुजवली यामुळेच आजची महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहू शकली आहे.