Rohit Pawar ( Marathi News ) : "पुढच्या डिसेंबरमध्ये शरद पवार साहेबांचं वय ८५ होणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांना आपण आपल्या पक्षाचे ८५ आमदार निवडून द्यायचे आहेत. हे लक्षात ठेवा, असं विधान 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन झाला. दोन्ही गटांनी वर्धापन दिन साजरा केला. शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा केला, तर अजित पवार मुंबईत साजरा केला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी जोरदार भाषण केले.
आमदार रोहित पवार यांनी या भाषणात विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही वर्धापन दिन सोहळा साजरा केला. या सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
आमदार रोहित पवार म्हणाले, आमच्याकडे असणारे हे कार्यकर्ते निष्ठावान आहेत. महाविकास आघाडीचा झालेला विजय याला फक्त निष्ठावंत पदाधिकारी जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत, युवकांना अडचणी आहेत. ते शरद पवार साहेबांकडे बघत आहेत. संघर्षाचा, स्वाभिमानाचा लढण्याचा पवार साहेब एक विचार आहे. लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार आपले निवडून आले. संघटनेच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी उत्कृष्ट काम केले त्यांचं मी आभार मानतो, असंही रोहित पवार म्हणाले.
"पलिकडच्या राष्ट्रवादीकडे पैसा सत्ता असला तरीही त्यांना लोकांनी नाकारले आहे. लोकांनी त्यांना नाकारले आहे. पवार साहेब रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाच्या भावावर बोलत आहे. आता हे आपले यश पाहून आपल्या मस्तकात जाता कामा नये, कारण पुढे विधानसभा निवडणुका आहेत. येणाऱ्या निवडणुकीत पलिकडच्या अनेक लोकांना आपण विश्रांती द्यायची आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना होत असताना सगळ्यांनी कष्ट घेतले. भुजबळ साहेब पायाला भिंगरी बांधून फिरत होते, त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. आज पक्षाला २५ वर्षे पूर्ण होत नसताना काही लोक आपल्याबरोबर नाहीत, याची मला खंत आहे. आर.आर. आबा, बेंडके सर अशा अनेकांचे योगदान होतं. गेली २४ वर्षे शरद पवार साहेबांनी पक्षाचं नेतृत्व केलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं सांगत अजित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.