राज्यातील २९ हजार कुटुंबांना ‘न्याय’चा अनुभव देणार-सत्यजीत तांबे; प्रदेश युवक कॉँग्रेसचा प्रतिकात्मक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 03:25 PM2020-05-20T15:25:34+5:302020-05-20T15:26:24+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. राज्यातील २९ हजार कुटुंबांना न्याय योजनेचा अनुभव देणार आहे, अशी माहिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
संगमनेर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. राज्यातील २९ हजार कुटुंबांना न्याय योजनेचा अनुभव देणार आहे, अशी माहिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
कॉँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत न्याय योजनेचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. वार्षिक उत्पन्न १ लाख ४४ हजार पेक्षा कमी असलेल्या सर्व कुटुंबांना कॉँग्रेस सरकारकडून दरमहा सहा हजार रूपये म्हणजेच दोनशे रूपये प्रतिदिन थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा होतील. अशी ही योजना होती. कुटुंबातील महिलेच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. जेणेकरून या पैशाचा दुरूउपयोग होणार नाही. अशी तरतूद या योजनेमध्ये होती. मात्र, केंद्रामध्ये कॉँग्रेसचे सरकार न आल्यामुळे न्याय योजनेची अंमलबजावणी होवू शकली नाही.
सध्या कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून निघाला आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र शासनाकडे न्याय सारखी योजना सुरू करण्याची मागणी करीत आहेत. गरजू कुटुंबियांच्या बॅँक खात्यात महिना सहा हजार रूपये जमा करावेत. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पुढील सहा महिन्यांसाठी अशीच एखादी योजना सुरू करावी. गरजूंना न्याय देण्याचे काम करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, असेही तांबे यांनी सांगितले.