जामखेड : शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करून दीड वर्ष झाले. ती रक्कम अद्याप मिळाली नाही, तसेच मागील वर्षी बनावट बियाणामुळे सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली होती. त्याचे पंचनामे झाले; परंतु अद्याप भरपाई मिळाली नाही. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पन्नास हजार रुपये वर्ग करावेत, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी केली.
नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ताबडतोब पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बियाणे, खते घेण्यासाठी होईल. सोयाबीन बियाणे उगवलेले नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले होते. त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. कृषी विभागाने पंचनामे केले होते. मात्र, वर्ष होत आले तरी अद्यापही कृषी विभागाकडून कसलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मुरूमकर यांनी केली आहे.
कांदा चाळीची राज्य पातळीवर होणारी सोडत तालुका पातळीवर व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली.