अहमदनगर: आयुक्त, महापौर येतात बदलून जातात, नगरसेवक निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. आमचा मात्र, गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अनेकवेळा निवेदन दिले, आंदोलन केले मात्र पाणी आम्हाला मिळालेच नाही. असा तीव्र संताप शहरातील सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी मंगळवारी महापालिकेत व्यक्त केला.
सिद्धार्थनगर येथील महिला, नागरिकांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत पाण्यासाठी अक्रोश मोर्चा काढला होता. आमचा पाण्यासाठीचा संघर्ष कधी थांबणार? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला केला. सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईनच टाकलेली नाही. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात चार नगरसेवक आहेत मात्र आमच्या मागणीची एकही नगरसेवक दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
मनपाने किमान तात्पुरती तरी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराव यावेळी नागरिकांनी दिला. उपायुक्ती श्रीनिवास कुऱ्हे यांनी यावेळी आंदोलनकांचे निवेदन स्विकारत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.