कोपरगाव : रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या. अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील, असा इशारा गोदावरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे, प्रमोद लंबडे, शिवाजी ठाकरे, किरण खर्डे, पोपट गोर्डे, रावसाहेब टेके आदी शेतक-यांच्या समितीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना निवेदनाव्दारे दिला आहे.हिवाळी अधिवेशन सुरु असले तरी शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. नाशिक पाटबंधारे विभाग गोदावरी कालव्यांच्या बाबतीत गंभीर नसून परिणामी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीचे आवर्तन मिळणार म्हणून शेतक-यांनी कर्ज काढून कांदा, गहू, फळबागा, मका, हरबरा, ज्वारी यासारखी पिके उभी केली. मात्र पहिल्याच आवर्तनात शेतक-यांची फसवणूक झाल्याने शेतका-यांमद्ये असंतोष निर्माण झाल्याची माहिती प्रमोद लंबडे यांनी मंत्री महाजन यांना दिली. मंत्र्यांनी तातडीने अधिका-यांना सूचना देऊन वस्तुस्थितीची माहिती देण्याचे आदेश दिले.
चालू आवर्तनात मागणी केलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या : संघर्ष समितीचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:13 AM