अहमदनगर : जिल्हा रूग्णालयात दिवसभर ताटकळत बसूनही अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप न करता पुढच्या बुधवारी या असा निरोप दिला. याबाबत उपस्थित अपंग बांधवांनी संताप व्यक्त करत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. रूग्णालयात माध्यमांचे प्रतिनिधी जाताच यंत्रणा तत्काळ कामाला लागली आणि अवघ्या दोन तासांत सर्व अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्यांची जिल्हा रूग्णालयात वारंवार हेळसांड होत असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा निदर्शनास आले. जिल्हा रूग्णालयात दर बुधवारी अपंगांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. बुधवारी जिल्हाभरातून अंध, अस्थीव्यंग, मूकबधिर असे विविध शारीरिक अपंगत्व असलेले ५०० जण रूग्णालयात आले होते. तीन आठवड्यापासून जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी संपावर असल्याने अपंगांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे बुधवारी गर्दी झाली होती. तपासणीसाठी दिवसभर रूग्णालयात थांबून राहिलेल्या अपंग बांधवांना डॉक्टराचे नातेवाईकांचे निधन झाले असल्याने ते आले नाहीत असा निरोप देण्यात आला. यावेळी अपंग बांधवांनी रूग्णालय प्रशासनाचा निषेध करत संताप व्यक्त केला. या ठिकाणी अनेक रूग्ण अकोले, संगमनेर, कर्जत, जामखेड आदी दूरवरील तालुक्यातून आले होते़ रूग्णालयात माध्यमांचे प्रतिनिधी जाताच प्रमाणपत्रांचे वाटप केले.