अहमदनगर : नगर जिल्हा जशी संतांची भूमी आहे, तशी ती कर्तृत्ववान माणसांची कार्यभूमी आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करा अशी चळवळ डॉ. सुधा कांकरिया यांनी ३५ वर्षांपूर्वी सुरू केली. या कार्यात देशभरात लाखो लोकांचा सहभाग व यश पाहता डॉ. सुधाताई यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करावे, असा प्रस्ताव समितीच्या अध्यक्ष या नात्याने आपण केंद्र शासनाकडे पाठवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. उजेडाचे मानकरी सन्मान सोहळ्याने नगर जिल्ह्याच्या वैभवात भर पडल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्त्रीजन्माचे स्वागत व बेटी बचाओ’ या चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकिरया यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती व चळवळीला ३५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माऊली सभागृहात रविवारी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६० जणांचा ‘उजेडाचे मानकरी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री राहीबाई पोपेरे, माजी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते. यावेळी विविध संस्था व व्यक्तींतर्फे डॉ. सुधा कांकरिया यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी पोपटराव पवार म्हणाले, सामाजिक कार्याची सलग ३५ वर्षे सेवापूर्ती होण्याचे नगर जिल्ह्यातील सुधाताई या एकमेव उदाहरण आहेत. सेवाभावी कार्याचा कांकरिया कुटुंबाचा त्याग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. वाढदिवसाच्या दिवशी स्वत:ला मिरवून घेण्यापेक्षा सार्वजनिक जीवनात सहप्रवासी ठरलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
माजी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, डॉ. सुधाताईंनी तरुणपणात स्वत:मध्येच रमण्यापेक्षा समाजात असणारी कमतरता हेरून ती दूर करण्यासाठी जीवापाड काम केले. हा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेण्याची गरज आहे.
बीजमाता राहिबाई म्हणाल्या, सुधाताईंचे काम बीजाप्रमाणे आहे. बी पेरले तरच धान्य उगवते. तसेच मुलीचा जन्म झाला तरच पुढील पिढी निर्माण होईल. याप्रसंगी ‘नकोशीला करूया हवीशी’ या उपक्रमातील ३ नकोशीचे नामकरण झालेल्या कन्या कल्याणी, स्वरदा, गायत्री या स्वत: उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मनस्वी कोरडे हिच्या गणेशवंदनाने झाली. त्यानंतर मान्यवरांनी पाठविलेल्या संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. प्रास्ताविक पत्रकार अविनाश मंत्री, सूत्रसंचालन राजेंद्र टाक, स्वागत डॉ. सुधा कांकरिया तर डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले.
---------
फोटो -२८ उजेडाची मानकरी
उजेडाचे मानकरी या सन्मान सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना पद्मश्री पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, माजी मंत्री सुभाष देशमुख, डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया.