बोटा : संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील गणपीरदरा शिवारात बिबट्याच्या हल्यात एक बोकड ठार झाला. गुरूवारी पहाटे तीनच्या वेळेला ही घटना घडली.गणपीरदरा येथील चाँदभाई शेख यांच्या घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. यावेळी शेख यांना जाग आल्यावर त्यांनी जोरात आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. आंबीखालसा येथेच बिबट्याच्या हल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती़ त्यावेळी वनविभागाने पिंजरा लावला होता़ मात्र बिबट्या पिंज-याकडे फिरकला नाही़ गुरुवारी पहाटे पुन्हा बिबट्याने बोकडावर हल्ला करुन त्याला ठार केल्यामुळे परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. तसेच बोरबन येथेही बिबट्याने एका पशुधनावर हल्ला केला आहे.
अकलापूर परिसरात बिबट्याचे दर्शन
अकलापूर येथील श्री स्वयंभू दत्त मंदिराच्या परिसरात नुकतेच बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रात्रीच्या सुमारास मंदिर परिसरात बिबट्या फिरत असताना ग्रामस्थांनी पाहिला होता. तेथेही बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला करुन त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे.