मतीन मनियार/मढी : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व देश लढण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर अनेकांची रोजंदारी बंद झाल्याने उपासमार सुरू आहे. श्रीक्षेत्र मढी येथे असलेल्या अनेक भटक्या कुटुंबीयांना संगम प्रतिष्ठानने या कुुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदतीचा हात दिला. तुमच्या रूपाने आम्हाला देवच भेटला.. भारतीय संस्कृती खरोखरच जगात सर्वश्रेष्ठ आहे, याचा प्रत्यय आल्याचे फातिमा आतार आणि सुवर्णा जाधव या महिलांनी सांगितले. संगम प्रतिष्ठानच्या वतीने भटक्या व बाहेरून आलेल्या कुटुंबीयांना शनिवारी किराणा व भाजीपाल्याचे वाटप केले. या मदतीने हे सर्व कुटुंबीय भारावून गेले होते. या मदतीने गरीब कुटुंबांची चूल पेटली आहे. चांगली माणसं समाजात असल्यानेच भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. संगम प्रतिष्ठानच्या वतीने माजी सरपंच देवीदास मरकड, सुधीर मरकड, भाऊसाहेब निमसे आदी मित्रमंडळींनी मिळून गहू, तांदूळ, तेल, शेंगदाणे साखर आदी किराणा माल व भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू मढी गावातील अनेक गरीब कुटुंबांना वाटप केले. आमच्या मित्रमंडळीनी एकत्रितपणे विचार करून परस्परांशी संपर्क करून या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू स्वखर्चाने खरेदी करून गरिबांपर्यंत पोहोचवल्या. गरिबांची या मदतीने चूल पेटली याचे मोठं समाधान असल्याची भावना देवीदास मरकड यांनी व्यक्त केली. यावेळी दानशूर ग्रामस्थ दिगंबर मरकड, भाऊसाहेब पाखरे, पारस गांधी, संगम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांंनी मदतीसाठी सहकार्य केले.
तुमच्या रुपाने आम्हाला देवच भेटला..मढीतील गरीब कुटुंबातील महिलेची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 2:19 PM