कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा धरणातून कोपरगाव तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावीत, अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पाटबंधारे विभागाचे राज्य सचिव यांना इमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
काळे म्हणाले, नाशिक पाटबंधारे विभागाचे गोदावरी डावा व उजवा कालव्यासाठी दारणा धरणातील आठ व गंगापूर धरणातील ३ टीएमसी पाणी आरक्षित आहे. असे एकूण ११ टीएमसी आरक्षित आहे. २६ मार्च अखेर दारणा धरणात ५ व गंगापूर धरणात ३ टीएमसी पाणी शिल्लक होते. तसेच रब्बी हंगामाच्या अवर्तनात केवळ दोन ते अडीच टीएमसी पाणी वापरले गेले आहे. सध्या दारणा धरणात पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. रब्बीतील गहू, हरभरा, मका आदी पिके संपली आहे. त्यामुळे जर रब्बीमध्ये अडीच टीएमसी पाण्यात एक आवर्तन झाले, तर उन्हाळ्यात शिल्लक पाच ते सात टीएमसी पाण्यात एप्रिल व मे मध्ये निश्चितच दोन आवर्तने होऊ शकतात. त्यामुळे पाटबंधारे १५ ते ३० एप्रिल आणि १५ ते ३० मे असे दोन उन्हाळ आवर्तने द्यावीत.