दहिगाव बोलका : गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे.संवत्सर शिवारातील गेट क्रमांक ११/२ च्या पुढे कालवा अत्यंत अरूंद झाला आहे. या कालव्याची वहन क्षमता ११० ते १५० क्युसेसपर्यंत आहे. पण कालव्यास भगदाड पडल्यामुळे पाणी वाहून नेण्याची कालव्याची क्षमता तीस क्युसेसपर्यंत खाली आली आहे. वैजापूर शहराला या आवर्तनात पाणी पुरवठा सुरू होता. पण आता कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. संवत्सर शिवारातील ११/२ च्या हेडच्या पुढील भागातील केवळ दहिगाव-पढेगाव रस्त्यावरील पुलापर्यंत वेड्या बाभळीचे काटवन, बाभळी काढल्या जातात. त्यापुढील काटवन तसेच कालव्याची साफसफाई होत नाही. यामागे कालवा जास्त दिवस चालवून लाभधारकांव्यतिरिक्त बिगरलाभधारकांना पाण्याचा जादा लाभ देण्याच्या उद्देशाने ही साफसफाई केली जात नसल्याची तक्रार काही लाभधारकांनी केली आहे.या कालव्यावर दहिगाव, लौकी, भोजडे, वारी या गावांमध्ये पाणी वापर संस्था आहेत. त्यांना गेज कुंडी नसलेल्या मापकाने पाणी दिले जाते. तेथे दरवेळी लाभधारकांचे काही ना काही पाणी भरणे शिल्लक राहते. त्यावेळी अधिकारी तुमच्या वाट्याचे पाणी दिल्याचे सांगून जबाबदारी झटकून मोकळे होतात. पण याच दरम्यान बिगर लाभधारकांचा कोपराही कोरडा राहत नाही.
साफसफाई केल्यास योग्य दाबाने पाणी देणे शक्य
या कालव्यावरील वेड्या बाभळीचे काटवन तसेच कालव्याची साफसफाई केल्यास वैजापूरसाठी जादा वेगाने पाणी तसेच कालव्यावरील चाऱ्यांमधूनही लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत योग्य दाबाने पाणी देणे शक्य होईल. पण कालव्याची साफसफाई करण्याची इच्छाशक्ती जलसंपदा विभागाकडून दाखविली जात नाही. उलट बिगर लाभधारकांना कालव्यातील पाणी दिले जात असल्याने जलसंपदा विभागाचे महसूल उत्पन्न बुडविण्यास याच विभागाचे अधिकारी, कर्मचारी हातभार लावताना दिसत आहेत.