श्रीरामपूर : गोदावरी नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. नाऊर ते निमगावखैरी रस्त्याचे उर्वरित कामही तडीस नेणार आहे, अशी ग्वाही काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांनी दिली. नाऊर येथील प्रचारसभेत कानडे बोलत होते.कानडे म्हणाले, गोदावरी नदीवरील नाऊर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाला गोविंदराव आदिक पाटबंधारे मंत्री असताना मंजुरी मिळाली. बंधाºयाचे काम काँग्रेस पक्षाच्या सरकारने पूर्ण केले. लोखंडी अर्ध गोलाकार पिना बदलून जादा वजनाच्या सरळ पिना टाकून जयंत ससाणे यांनी बंधारा अडवला. तो पूर्ण क्षमतेने भरल्याने नाऊर, जाफराबाद, नायगाव, मातुलठाण या गावात बागायत क्षेत्र वाढले. गोदावरी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बंधाºयाचे नुकसान झाले. लोकप्रतिनिधींनी सर्वात प्रथम बंधारे दुरुस्तीसाठी निधी आणायला हवा होता. परिसरातील शेतकरी स्वत: वर्गणी गोळा करुन बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. हे काम सरकारकडून करून घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी स्वत: खर्च करतो, याची खंत लोकप्रतिनिधींना वाटत नाही का? करण ससाणे म्हणाले, नाऊर, रामपूर, गोवर्धन, सराला, नायगाव येथील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधी यांनी काय काम केले, असा प्रश्न निर्माण होतो. कानडे यांना संधी द्या. त्यांच्याकडून रस्त्यांची कामे पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे. सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, कैलास बोर्डे, जितेंद्र भोसले, कवाडे गटाचे संतोष मोकळ आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, गोपूतात्या शिंदे, युवा नेते हेमंत ओगले, डॉ. बापूसाहेब आदिक, सुभाष राजुळे उपस्थित होते.माजी नगरसेवक नजीर मुलानी यांनी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. मुलानी यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची भेट घेतली. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, हेमंत ओगले, भाऊसाहेब डोळस, नगरसेवक मुक्तार शाह, मुजफ्फर शेख उपस्थित होते.
गोदावरीतील बंधारे दुरूस्त करणार-लहू कानडे; नाऊर येथे प्रचारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:18 PM