कोपरगाव : तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक पाठबंधारे विभागाने पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात बंधा-याच्या फळ्या काढून पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात नदीकाठच्या सर्वच गावच्या शेकडो शेतक-यानी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी एकत्र येत कोपरगाव तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला. तहसीलदार, तालुका पोलीस ठाणे, वीज वितरण कार्यालयालयात निवेदन देत प्रशासणाचा तीव्र शब्दात निषेध केला.गोदावरी नदीवरील हिंगणी तसेच इतरही बंधा-यात जेमतेम पाणी साठवले होते. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे ऊर्ध गोदावरी खो-यातून २.६४ टीएमसी पाणी पूर्ण बंदोबस्तात सोडण्यात आले. आता पुन्हा बंधा-याच्या फळ्या काढून जायकवाडीला सोडण्यात येणार आहे. जर हे पाणी सोडल्यास गोदावरी नदी काठच्या सर्वच गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा योजना, जनावरांच्या पिण्याच्या तसेच चा-याचा प्रश्न या पाण्यावर अवलंबून असल्याने हेच पाणी जर पुन्हा जायकवाडीला सोडल्याने शेतक-यांचा, जनावरांचा जीवन मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाल्याने ऊस तोडणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी, मुर्शदपूर, धारणगाव, सोनारी, कुंभारी या पाच गावातील शेतकरी आपल्या कुटंबातील मुलाबाळासहीत जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी गोदावरी नदीकाठच्या सर्वच गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
गोदाकाठचे शेतकरी आक्रमक ; जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 5:28 PM