- सुधीर लंके ।अहमदनगर : सर्वधर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात सर्वत्र भगवे फलक बसविले असून, नव्याने उभारलेल्या शताब्दीच्या ध्वजस्तंभावरही ओम आणि त्रिशूळ बसविला आहे. ही प्रतीके पारंपरिक पद्धतीने वापरली आहेत, असे संस्थानचे म्हणणे आहे.साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिर्डीत १ आॅक्टोबरपासून साईशताब्दी महोत्सव सुरू होत आहे. राष्टÑपतींच्या हस्ते रविवारी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ५१ फूट उंचीचा आकर्षक ध्वजस्तंभ बसविण्यात आला आहे. त्यास सुवर्णझळाळी दिली आहे. स्तंभावर ओम आणि त्रिशूळ बसविण्यात आला आहे.साईबाबा हे सर्वधर्मीय मानले जातात. ‘सबका मालिक एक’ असा संदेश त्यांनी दिला. साईमंदिरात दररोज सकाळी १० वाजता साईबाबांच्या समाधीवर हिंदू-मुस्लीम एकत्रित चादर चढवितात. शीख, ख्रिश्चन असे सर्व भाविक शिर्डीत हजेरी लावतात. साईबाबांचे हे सर्वधर्मनिरपेक्ष रूप व त्यांचे तत्त्वज्ञान शिर्डी संस्थाननेही आजवर जपले आहे. साईबाबांचा जात-धर्म कोणता हेही अज्ञात आहे. साईबाबांनी ते कधी उघड केलेले नाही. संस्थानने काढलेल्या साईचरित्रात साईबाबांच्या जातधर्माचा उल्लेख आलेला नाही.विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरातील जुने निळ्या, काळ्या रंगांतील फलक काढून भगव्या रंगात फलक लावले आहेत. भगव्या रंगाचा वापर संस्थानमध्ये वाढला आहे. मंदिराने शेगाव संस्थानच्या धर्तीवर सेवेकरी योजना सुरू केली आहे. शेगावच्या सेवेकºयांचा गणवेश पांढरा आहे. शिर्डी संस्थानने मात्र सेवेकरी योजनेचे अनुकरण करताना सेवेकºयांचा सदरा भगवा केला आहे. शताब्दीच्या ध्वजस्तंभावर ओम, त्रिशूळ ही धार्मिक प्रतीके वापरण्यात आली आहेत.तीच प्रतीके ध्वजस्तंभावर...पारंपरिक पद्धतीने साईमंदिरात जी प्रतीके वापरली जातात तीच प्रतीके ध्वजस्तंभावर वापरण्यात आली आहेत. दररोज साईबाबांची जी पूजा होते, त्या वेळी ओम असतो. त्यांचा झेंडाही भगवा आहे. भगवा रंग उठून दिसतो. त्यामुळे फलक भगव्या रंगात करण्यात आले आहेत. त्यामध्ये वेगळे काही नाही, असे शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितले.राष्ट्रपती आज साईनगरीतराष्टÑपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रविवारी शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच शिर्डीजवळ काकडी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे लोकार्पणही राष्टÑपतींच्या हस्ते होत आहे.
शिर्डीच्या मंदिरात भगवे फलक, ओम आणि त्रिशूळ; राष्ट्रपती आज साईनगरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:35 AM