जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या तुमच्या कामाच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे विकासकामे करून मते मागत आहेत. विरोधकांनी काय काम केले? अशी टीका भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ नान्नज (ता. जामखेड) येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. तेथे त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, वीस वर्षे मी तिकडे होते. त्यामुळे तेथील मला माहिती आहे. आपल्याच माणसाला सुख दु:ख कळतात. या लोकशाहीच्या मोठ्या उत्सावात विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या भावाने (राम शिंदे) पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकास कामे केली. त्यांची उतराई म्हणून भावाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शिंदे, सरपंच विद्या मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, पंचायत समितीच्या सदस्या मनीषा सुरवसे, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात आदी उपस्थित होत्या.आशा शिंदे म्हणाल्या, घराणेशाही विरूद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे. समोरचा माणूस प्रस्थापित आहे. पन्नास वर्षांपासून त्यांचे घराणे राजकारणात आहे. शिंदे यांना तुम्ही अधिकाराने बोलू शकता. समस्या मांडू शकता. विरोधकांना भेटण्यासाठी पास लागतात. त्यामुळे तुमच्या समस्या मांडताना तुम्हाला ताटकळत बसावे लागेल, अशी टीका शिंदे यांनी केली.
लंकेतील सोन्याच्या विटा तुमच्या काय कामाच्या-चित्रा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 4:24 PM