पिंपळगाव माळवी : जगासह देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोना या महाभयंकर आजाराने शेतक-यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतक-यांवर आर्थिक कु-हाड कोसळली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.सागर गुंड यांनी आपल्या शेतीमध्ये बँकेकडून कर्ज घेऊन पॉलिहाऊस बांधले असून दहा गुंठ्यांमध्ये तीन हजार रंगीत ढोबळी मिरची रोपांची लागवड केली होती. मशागत, औषध फवारणी यावर दीड लाख रुपये खर्च केला होता. या मिरची पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा गुंड यांना होती. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बाजारपेठा ठप्प झाल्यामुळे या मिरचीला मागणी नाही. त्यामुळे गुंड यांनी रंगवलेल्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. गुंड यांनी रोजाने शेत मजूर लावून मिरची तोडून बांधावर फेकून दिली आहे. मागणी नसल्यामुळे त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
डिसेंबर महिन्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली होती. कुटुंबासह रात्रंदिवस कष्ट घेतले. समाधानकारक पीक आले. परंतु मागणीअभावी चार टन माल फेकून द्यावा लागला. अजून तीन महिने उत्पादन होईल, परंंतु लॉकडाऊन असाच राहिला तर बरबाद होण्याची वेळ निश्चितच येईल, असे शेतकरी सागर गुंड यांनी सांगितले.