श्रीगोंदा : आढळगाव येथील व्यापारी नीलेश व पूजा गुगळे दाम्पत्यास आठ वर्षांनंतर मुलगी झाली. या परीचे आलिशान कारमधून गावात आगमन होताच गावकऱ्यांनी सडा, रांगोळी आणि फुलांची सजावट आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जंगी स्वागत केले.
मुलगी झाली की समाजात अनेक कुटुंब नकारात्मक भूमिका घेतात. उच्चभ्रू समाजात कळ्या सोनोग्राफी करून आईच्या उदरातच खुडण्यात आल्या. त्यामुळे मुलीचा जन्मदर घसरला आहे. सामाजिकदृष्ट्या हा चिंतेचा विषय बनला आहे. पण, आढळगाव येथील नीलेश व पूजा गुगळे यांना आठ वर्षांनंतर वंशवेल फुलला आणि कन्या झाली. गुगळे परिवारात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कन्येचे आजोळावरून आढळगाव आगमन होणार याची चाहुल अगोदर लागली होती. गुगळे परिवार व गावातील मित्र परिवाराने रांगोळी काढली. पुष्पोत्सव तयार केला.
वेल कम परी.. अशी रांगोळी रेखाटली. फटाके वाजून स्वागत केले.
परीसह नीलेश व पूजा या दाम्पत्याचे सरपंच शिवप्रसाद उबाळे, सुभाष गांधी, अनिल ठवाळ, उत्तम राऊत, शरद जमदाडे, माऊली उबाळे, डॉ. कुमुदिनी शिंदे, ताराबाई खराडे यांनी शाल व साडी चोळी देऊन स्वागत केले.
....
आढळगावमध्ये कोणत्याही कुंटुबांत मुलीचा जन्म झाला की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या मुलीच्या नावावर एक हजाराची कन्यादान ठेव योजना राबविणार आहे. घराच्या प्रवेशद्वारावर मुलीचे नाव असलेली डिजिटल फलक लावणार आहे.
- शिवप्रसाद उबाळे, सरपंच, आढळगाव.