नेवासा : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी राम मंदिराच्या शिलान्यास व भूमिपूजन सोहळा होत आहे. यासाठी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे सोमवारी (३ आॅगस्ट) सकाळी ९.३० च्या सुमारास अयोध्येकडे रवाना झाले. साधू, संत व कार सेवकांच्या बलिदानामुळेच अयोध्येत शिलान्यास व भूमिपूजन करण्याचा सुवर्णयोग आला असल्याची भावना भास्करगिरी महाराजांनी निघण्यापूर्वी बोलून दाखवली.
आज तब्बल ५०० वर्षानंतर रामाचे मंदिर निर्माणाचे स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण देशवाशीयांची भावना यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. यासाठी अनेक संत, महंत, रामभक्त कारसेवक यांनी अपार कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्रातील संप्रदायाच्या वतीने आम्हाला ही संधी प्राप्त झाली आहे. आपण दिलेल्या श्रद्धेच्या भावनांचे गाठोडे घेऊन आम्ही अयोध्येला जात आहोत. मंदिराची उभारणी सामंजस्य व मानवतेची उभारणी आहे. त्यांना इतर जाती, धर्मात गुंफवू नका असे आवाहन त्यांनी केले. ५ आॅगस्ट रोजी सर्वांनी मठ मंदिरात व घरासमोर रांगोळया काढून सडामार्जन करावे. प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करावे. दुपारी १२ वाजता आरती करुन प्रसाद वाटावा. यावेळेस आपण सर्व जण अयोध्येला आहोत, अशी भावना मनाशी बाळगून हा आनंद साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले....खारीचा वाटा म्हणून पूजा करणारप्रभू रामचंद्रांचे अयोध्येतील मंदिर हे जगात आदर्श ठरावे, असा प्रयत्न न्यास समितीचा आहे. अयोध्येला निघण्यापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या समाधीसह भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते संत पूजन करून भास्करगिरी महाराजांचा सत्कार करण्यात आला.