अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ऊस दर वाढीवरुन आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यातील जखमी शेतक-यांची भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. या गोळीबारावरुन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तर काँग्रेसने सातारा आणि नगरमधील प्रकरणांवरुन स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निशाणा केला़ मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तो फेटाळत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. आता शिवसेनेकडून शेतकरी गोळीबारावरुन भाजपला घेरण्याची तयारी सुरु आहे.गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जखमींची भेट घेत शेतक-यांवरील गोळीबारावरुन सरकारवर टीका केली़ शेतक-यांवरील गोळीबारावरुन सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही जखमींची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. विखे म्हणाले, एफआरपीनुसार ऊस दर न देणा-या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी. त्यांचे होणी हात धरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाची खाती त्यांच्याकडेच ठेवली आहेत. गृहखाते प्रभारी आहे़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवरच वचक नाही. सांगली व नगरमधील घटना पाहता पोलीस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांवर गोळीबार करणा-या पोलिसांना तत्काळ निलंबीत करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आज (शुक्रवारी, दि़ १६) जखमी शेतक-यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोनवरुन या शेतकरी गोळीबाराची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यामुळे शिवसेनाही या मुद्यावरुन सरकारला घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेवगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलनावरुन राजकीय पटलावर ‘गोळीबार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:15 PM