श्रीरामपूर : शहरातील गोंधवणी रस्ता, मिल्लतनगर भागामध्ये कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांची गैरसोय होत आहे, अशी खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. बँकिंग सुविधा केवळ शिवाजी रस्ता व मुख्य रस्त्यावर निर्माण करण्यात आल्या. मात्र दशमेशनगर, गोंधवणी गाव, संजयनगर, रामनगर, लक्ष्मीनारायणनगर, गिरमे मळा ही मोठी लोकवस्ती बँकिंग सेवेपासून वंचित राहिली. पूर्वी दशमेशनगर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा कार्यरत होती. त्यामुळे थोडाफार लाभ होत होता. आता मात्र ही शाखा बंद करण्यात आली. आता कोणत्याही बँकेची शाखा या भागात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. या भागात किमान एखादी बँक शाखा व किमान दोन ठिकाणी एटीएम केंद्र सुरू करावे, असे सामाजिक कार्यकर्ते जोएफ जमादार यांनी म्हटले आहे.
आमदार व नगराध्यक्षांनी बँकांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढावा, अशी मागणी अरबाज पठाण, शोएब पठाण, अबूजर सय्यद, सोहेल शेख, मुस्ताक शेख, अतुल सोनवणे, सचिन रणदिवे, अशोक त्रिभुवन, अजिंक्य शिंदे, सतेज शेळके आदींनी केली आहे.