मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर एका ठिकाणची शेतजमीन उचलून चक्क दुसर्या ठिकाणी नेण्याचा प्रताप श्रीरामपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने करून दाखविला आहे. बबलू रज्जाक पठाण यांची भैरवनाथनगर ग्रामपंचायत हद्दीत लबडे पेट्रोल पंपाशेजारी शेतजमीन आहे. तिचा जुना गट क्रमांक ११८/८ व नवा गट क्रमांक ७४/१५ असा आहे. त्यांनी या जमिनीच्या मोजणीसाठी श्रीरामपूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे तातडीची मोजणी म्हणून ३ हजार रूपये भरले. या मोजणीसाठी २१ दिवसांची मुदत असताना ३८ व्या दिवशी या कार्यालयाचे मोजणी कर्मचारी मोजणीस्थळी आले. पण शेजारच्या एका तक्रारदार शेतकर्याच्या दबावातून हे कर्मचारी मोजणी न करताच माघारी फिरले. पण त्याचवेळी पठाण यांच्या कोर्या कागदावर सह्या घेतल्या. नंतर याच कागदावर अर्जदारास जागा दाखविता न आल्याने सरकारी कामाची खोटी झाल्याचे कारण देत मोजणी करायची असेल तर नव्याने मोजणी शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. याच दरम्यान पठाण यांनी एकलव्य सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना कार्यालयातून या जमिनीच्या नकाशाची प्रत शहानिशा करण्यासाठी मिळविली. हा नकाशा श्रीरामपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या नकाशाशी पडताळून पाहिला असता त्यांना धक्काच बसला. या नकाशात त्यांची जमीन श्रीरामपूर पुणतांबा रस्त्याच्या डाव्या बाजूला दिघी रस्त्यालगत असताना चक्क ती पुणतांबा रस्त्याच्या उजव्या बाजूला दर्शविण्यात आली आहे. याच कार्यालयातून पठाण यांनी मिळविलेल्या नकाशात मात्र त्यांची जमीन पुणतांबा रस्त्याच्या डाव्या बाजूस दिघी रस्त्यालगत दाखविण्यात आली. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाने एकाच शेतजमिनीच्या जागा दोन नकाशांमध्ये दोन ठिकाणी दाखवून रस्त्याच्या एका बाजूची जमीन थेट दुसर्या बाजूला उचलून नेऊन ठेवण्याचा प्रताप केल्याचे स्पष्ट झाले आहे. नकाशामध्ये एका बाजूची जमीन दुसर्या बाजूला उचलून नेऊन ठेवण्याचा प्रताप करणार्या या कार्यालयामार्फत केल्या जाणार्या जमिनींच्या मोजणीविषयी तसेच त्यानंतर दिल्या जाणार्या जमीन मोजणीच्या नकाशांच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चक्क शेतजमीन पळाली
By admin | Published: May 21, 2014 12:19 AM