कोरोनामुळे देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी व्यवस्था ठप्प झाली होती. त्या कालखंडात दूध संघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकरी व दूध संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने सहकार क्षेत्राला उभारी मिळाली. त्यातच राज्य सहकारी दूध संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याची परवानगी व आरेचे मुंबईमधील स्टॉल महानंदाला मिळाल्यापासून महानंदाची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. महानंदाच्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री संपूर्ण राज्यभर करण्यासाठी दूध विक्री स्टॉलची लवकरच निर्मिती केली जाणार आहे.
महानंदाचे दूध व दुग्धजन्य उत्पादने गुणवत्तापूर्ण व उच्चप्रतीचे असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे महानंदाची उत्पादने अधिकच लोकप्रिय ठरली आहेत. महानंदाच्या अतिरिक्त दुधाची बनलेली दूध भुकटी राज्य शासनाच्या अटल अमृत आहार योजनेंतर्गत व बालकल्याण आदिवासी विभागामार्फत योजनेत समाविष्ट सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. महानंद व केंद्रीय रक्षा मंत्रालय यांच्यात करार झाला असून भारतीय सैन्याला दूध पुरवठा महानंदाने सुरू केला आहे. महानंदाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे.