गुड न्यूज- अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार, आरोग्यासाठी २५ कोटीपर्यंत निधी मिळणारअहमदनगर- केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. महापालिकेने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले आहे. या मानांकनामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त होणार आहे.
अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाल्याची गोड बातमी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सकाळीच दूरध्वनी करून महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिली. तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही द्विवेदी यांनी दुरध्वनी करून अभिनंदन केले.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी अहमदनगर शहरात केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, कचरामुक्त शहरासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला होता. शहरातील कचरा कुंड्याही हटविण्यात आल्या होत्या. वासुदेव आलाच्या धर्तीवर दारोदारी घंटाघाडी फिरली. शहरातील रस्त्यावर पडणारा कचराही हटविण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मोहिमेला गती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. शहर स्वच्छ व्हावे,यासाठी ते स्वत: मैदानात उतरले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्याधिकारी डॉ. एन.एस. पैठणकर, स्वच्छता निरीक्षक, नगरसेवक आणि स्वच्छता कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले. नागरिकांनीही महापालिकेच्या प्रयत्नांना साथ दिली. त्याम्ुळे शहर स्वच्छ झाले आणि थ्री स्टार मिळाला.
-----------------------प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि स्वच्छता, आरोग्य यासाठी मनापासून काम केले. त्यासाठी सर्वांनी योगदान दिले. जागृती केली. त्यामुळे अहमदनगरला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाला. यामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळणार आहे. हा निधी शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच शहर कचरामुक्त करण्यासाठी उपयोगात आणू. सर्वांचे आरोग्य चांगले राहिले तर मन चांगले राहील. मन चांगले असेल तर सर्व प्रगती करू शकतील. त्यामुळे शहर आरोग्यदायी नक्कीच होईल. थ्री स्टार पुरस्कार मिळाल्यामुळे कष्टाचे चीज झाले आहे, याचा निश्चितच आनंद वाटतो आहे.-बाबासाहेब वाकळे, महापौर