अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याकरिता आता 31 एप्रिल पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तसा आदेश पणन विभागाची उपसचिव मोहन निंबाळकर यांनी शुक्रवारी जारी केला आहे.
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये प्रमाणे अनुदान जाहीर केले आहे .या अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याकरिता 20 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु ,अनेक शेतकऱ्यांनी अद्याप अनुदानासाठी अर्ज दाखल केलेले नाहीत. कागदपत्रांची पूर्तता ही शेतकऱ्यांकडून झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन सहकार विभागाने कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याकरिता 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनुदानासाठीचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केले आहे.