संदीप घावटेदेवदैठण : विद्यार्थ्यांची शाळा मंगळावर भरली तर.. खूप धमाल येईल ना.. तेथील जमीन, पर्वत पहायला खूप मजा येईल ना.. तेथील आपली शाळा, वर्ग, तिथे जाऊन झाडे लावायची, तेथील पक्ष्यांना चारा पाण्याची सोय करू भन्नाट कल्पनांची बरसात होऊ लागली.. खरंच शाळा थेट मंगळावर भरली तर कल्पना छान वाटतेय ना.. श्रीगोंदा तालुक्यातील गोपाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे फोटो तसेच नावासह सगळी माहिती यानाच्या साहाय्याने मंगळ ग्रहावर पोहचणार आहे.ही माहिती नासा संस्थेकडे पाठविली आहे. या माहितीचे बोर्डींग पासही आले आहेत. बोर्डींग पास आल्याने चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. उपक्रमशील शिक्षिका शोभा कोकाटे-दरेकर व शिक्षक पद्माकर औटी यांनी चिमुकल्यांसाठी हा उपक्रम राबविला आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्षयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे.नासाने जगाभरातील जनतेला आपल्या नावाच्या पाऊलखुणा मंगळावर सोडण्याची संधी ‘स्टेनफिल्ड चिप’च्या सहाय्याने उपलब्ध करून दिली आहे.नासाच्या पसाडेना कॅलिफोर्निया जेट प्रोफेल्शनल बोरिटतल्या मायक्रोडिवायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलीकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ७५ नॅनोमीटर रुंदीत आपण नोंदवलेली नावे टेन्सील केली जाणार आहेत.अशा एक डेमी आकाराच्या चिपवर दहा कोटी नावे मावतील. ही चिप रोव्हरवर जतन करून मंगळावर पाठवली जाणार आहे. या उपक्रमात आतापर्यंत जगभरातील ७४ लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे.विद्यार्थ्यांना यानाविषयी, अवकाश संशोधनाविषयी माहिती व्हावी, त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून हा उपक्रम शाळेने राबविला आहे. -शोभा कोकाटे, पद्माकर औटी, शिक्षक, गोपाळवाडी, ता. श्रीगोंदा